बारामतीत राज्यस्तरीय नेटबॉल पंच प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्

महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांतील १०० हून अधिक पंच व प्रशिक्षकांचा सहभाग; प्रशिक्षण, कार्यशाळा आणि परीक्षेचे आयोजन

प्रतिनिधी – महेंद्र रणधीर

बारामती : नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (NFI), ॲमेच्युअर नेटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ANSAM) आणि टी. सी. कॉलेज, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय नेटबॉल पंच प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळा व परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. शनिवार (दि. ३१ ऑक्टोबर) ते रविवार (दि. १ नोव्हेंबर) या दोन दिवसांच्या कालावधीत झालेल्या या शिबिरात महाराष्ट्रातील तब्बल २७ जिल्ह्यांमधून १०० हून अधिक पंच व प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

टी. सी. कॉलेजच्या प्रशासन भवनातील सेमिनार हॉलमध्ये शिबिराचे उद्घाटन झाले. संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. जवाहर शेठ शाह वाघोलीकर यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ॲमेच्युअर नेटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षा व आंतरराष्ट्रीय नेटबॉल खेळाडू शरयू जगताप, सेक्रेटरी ऋतुराज यादव, ऑब्झर्व्हर पवन पटले, टी. सी. कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. गौतम जाधव, उपाध्यक्ष गणेश चौधरी, एक्झिक्युटिव्ह मेंबर महेशकुमार काळदाते, वरुण पोमणे, प्रतीक कंग्राळकर, अनिकेत देशमुख, केतन दुगड, अविनाश वाघ, गणेश म्हस्के, रमेश नांदेडकर, योगेश उगले आणि विनय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या पहिल्या दिवशी सकाळी प्रशिक्षणार्थींची नोंदणी करण्यात आली. पहिल्या सत्रात ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नेटबॉल खेळाचे मूलभूत नियम तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडे झालेल्या नियमांमधील बदलांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष विक्रमादित्य यांनी पंचांना नियमांची तांत्रिक माहिती दिली. सायंकाळच्या सत्रात प्रत्यक्ष सामन्याच्या माध्यमातून गुणपत्रिका कशी भरावी, सामन्याची नोंद कशी ठेवावी आणि तांत्रिक बाबींची अंमलबजावणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पंच व प्रशिक्षकांची मैदानावर शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष सामन्याच्या माध्यमातून पंचांची कर्तव्ये, अधिकार, जबाबदाऱ्या आणि सामन्यादरम्यान द्यावयाचे विविध संकेत (सिग्नल) याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना टी-शर्ट, कॅप, शिट्टी आणि नेटबॉल खेळाची नियमावली वितरित करण्यात आली.

दुपारच्या सत्रात नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हरिओम कौशिक, अमित अरोरा तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित पंच व प्रशिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी नेटबॉल खेळाच्या विकासासाठी पंचांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यक्षा शरयू जगताप, सेक्रेटरी ऋतुराज यादव आणि ऑब्झर्व्हर पवन पटले यांनी संघटनेची ध्येयधोरणे, अधिकृत स्पर्धांचे आयोजन, पंचांची भूमिका आणि नेटबॉल खेळाच्या नियमांबाबत आवश्यक सूचना दिल्या. उपस्थित पंच व प्रशिक्षकांच्या वतीने प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, राष्ट्रीय पंच गणेश म्हस्के आणि पवन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. टी. सी. कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. गौतम जाधव यांनी आभार मानले.

या शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी पुणे नेटबॉल स्पोर्ट्स फेडरेशनने सांभाळली. भोजनाची व्यवस्था पुणे नेटबॉल स्पोर्ट्स फेडरेशनकडून, तर निवास आणि मैदान व्यवस्थेचे नियोजन टी. सी. कॉलेज, बारामती यांच्याकडून करण्यात आले होते. सर्वांच्या सहकार्यामुळे दोन दिवसांचे हे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमामुळे राज्यातील नेटबॉल पंचांची तांत्रिक क्षमता वाढण्यासह खेळाच्या दर्जेदार विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail