प्रतिनिधी – संदीप भालेराव
यवत -: दौंड तालुक्यातील वनक्षेत्राच्या विकासाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाटस, रोटी, कुसेगाव आणि पडवी परिसरातील सुमारे २४०० एकर वनक्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश आमदार राहुल कुल यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. या माध्यमातून वनक्षेत्रात जलसंधारण, तलावांचे खोलीकरण, वृक्षलागवड आणि पर्यटन विकासाची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
दौंड तालुक्यातील वनविभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुण्यातील गोखलेनगर येथील वनभवनमध्ये आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वनक्षेत्र विकासासह शेतकऱ्यांचे प्रश्न, बिबट्यांचा वाढता वावर आणि पर्यटन प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वनसंरक्षक (पुणे वनवृत्त) आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, विभागीय वन अधिकारी अमोल थोरात आणि सहायक वनसंरक्षक अतुल जैनक उपस्थित होते.
तलावांच्या खोलीकरणातून जलसाठा वाढविणार
दौंड तालुक्यातील वनक्षेत्रात अनेक मोठे तलाव असून, त्यांचे खोलीकरण व दुरुस्ती केल्यास पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे या कामांचे प्रस्ताव तातडीने तयार करून वनविभाग आणि जलसंधारण विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार कुल यांनी दिल्या. या कामांमुळे परिसरातील शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच वन्यजीवांना पाण्याचा स्रोत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
बिबट मानव संघर्ष रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत असल्याने नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वनविभागाने सतर्क राहावे, असे स्पष्ट निर्देश आमदार कुल यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या जमिनीवरील चुकीच्या वननोंदी रद्द करा
तालुक्यातील अनेक खासगी जमिनींवर वनविभागाच्या चुकीच्या नोंदी झाल्यामुळे जमीनधारक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बँक कर्ज प्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना या नोंदी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांची तातडीने पडताळणी करून चुकीच्या वननोंदी रद्द करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.
पर्यटन प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी
दौंड तालुक्यातील विविध पर्यटन विकासाचे प्रस्ताव सध्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, या प्रस्तावांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. पर्यटन प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पांमुळे दौंड तालुक्याला पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळण्याबरोबरच स्थानिक तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
“दौंड तालुक्याची वनसंपदा ही आपली मोठी ताकद आहे. निसर्गाचे संवर्धन, जलसमृद्धी, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांना न्याय आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्व आघाड्यांवर तालुक्याला पुढे नेण्यासाठी या कामांचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असा निर्धार आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.
एकूणच, दौंड तालुक्यातील वनक्षेत्राचा नियोजनबद्ध विकास, जलसाठ्यात वाढ, वन्यजीव संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.









