दहा वर्षांपासून दिवाळी अभियानाची परंपरा कायम; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला आनंद
– योगेश राऊत
पाटस (ता. दौंड) : दिवाळीचा सण म्हटला की आनंद, उत्साह आणि गोडधोडाची रेलचेल सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, उदरनिर्वाहासाठी घरापासून दूर राहून ऊसतोड आणि वीटभट्टीवर कष्ट करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांना अनेकदा सणाचा आनंद पूर्णपणे अनुभवता येत नाही. अशा कष्टकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी पाटस ग्रामविकास फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनच्या वतीने बुधवार (दि. ४ नोव्हेंबर) रोजी दिवाळी अभियानांतर्गत ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार तसेच भटके व छोटे व्यावसायिक यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कामगार कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच या अभियानाचे खरे फलित ठरले.
पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून दिवाळी अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या काळात अनेक कष्टकरी कामगारांना आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम करावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सणाचा आनंदही मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनने अशा कामगार कुटुंबांपर्यंत दिवाळीचा गोडवा पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यंदाही या परंपरेचे जतन करीत कामगारांना मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
विशेष म्हणजे, फाउंडेशनचे कार्य केवळ सण-उत्सवांपुरते मर्यादित नसून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शाळांना मैदान तयार करून देणे, वर्गखोल्यांची उभारणी करणे, विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके व वह्यांचे वाटप करणे अशा उपक्रमांवर भर दिला जातो. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देतानाच शैक्षणिक विकासालाही प्राधान्य देण्याचे काम फाउंडेशनकडून केले जात आहे.
या उपक्रमावेळी फाउंडेशनचे संस्थापक विनोद कुरुमकर, माजी अध्यक्ष गणेश जाधव, विद्यमान अध्यक्ष गौतम पानसरे, उपाध्यक्ष राज मुलाणी, सचिव रिजवान शेख यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या सणानिमित्त मिळालेल्या या छोट्याशा भेटीमुळे कामगार कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. समाजातील कष्टकरी, वंचित आणि गरजू घटकांच्या आनंदात सहभागी होणे, हीच सामाजिक बांधिलकीची खरी ओळख असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल कामगारांनी कृतज्ञता व्यक्त केली.









