सोशियल मिडिया ग्रुपवरुन एक हात मदतीचा ग्रुपच्या माध्यमातून ऊसतोड व वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत दिवाळीचा आनंद!

केडगाव व परिसरातील ऊसतोड कामगार आणि वीटभट्टी कामगारांच्या कुटुंबातील मुलांसाठी दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

प्रतिनिधी: नितिन गव्हाणे

गेल्या दहा वर्षांपासून धनराज मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक हात मदतीचा’ या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच सेवाभावी परंपरेचा एक भाग म्हणून यंदाही ऊसतोड व वीटभट्टी कामगारांच्या मुलांना दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्यांच्याही घरी दिवाळीचा गोडवा पोहोचावा, या उद्देशाने फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी ‘एक हात मदतीचा’ या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सदस्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत गोळा करण्यात येते. ग्रुपमधील दानशूर सदस्य, मित्रपरिवार आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सहकाऱ्यांच्या योगदानातून जमा झालेल्या निधीचा उपयोग अशा गरजू कुटुंबांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी केला जातो.

समाजातील वंचित, गरजू आणि कष्टकरी कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि सण-उत्सवांचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करणे, हाच या ग्रुपचा मुख्य उद्देश आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून कोणताही मोठा गाजावाजा न करता केवळ सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या भावनेतून हा सेवाप्रवास सुरू आहे. शिक्षण, आरोग्य, अन्नधान्य, गरजू विद्यार्थ्यांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘एक हात मदतीचा’ ग्रुपने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 यावेळी ग्रुपचे सदस्य धनराज मासाळ, प्रिया कल्पेश पटेल, शबनम डफेदार मॅडम, संतोष काकडे, श्रीकांत चव्हाण, ऋषी शिंदे, सुरज गलांडे, उपासना मासाळ हे मान्यवर उपस्थित होते 

“दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटवण्यात आहे.”

या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रुप सदस्यांचे, दानशूर व्यक्तींचे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

एक हात मदतीचा – सेवा हीच आमची ओळख!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail