दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. अजित जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका, उद्दिष्टे तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील योगदान याविषयी माहिती दिली. रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती किरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेकवसा फाउंडेशन, पुणेचे संस्थापक संघटक विशाल विमल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, हवामान बदलाचा परिणाम मानवी जीवन, शेती, पाणी, अन्नसुरक्षा आणि पर्यावरणावर होत असून त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. हवामान बदलामुळे तापमानवाढ, पर्जन्यमानातील अनिश्चितता, पाण्याची उपलब्धता, प्रदूषण आणि प्लास्टिक कचरा यांसारख्या समस्या गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणी बचत, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकचा कमी वापर, कचरा व्यवस्थापन, ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ मुंढे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये ‘मी नव्हे, तू’ या सेवाभावाची जाणीव निर्माण करून त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. रंजना जाधव व उपप्राचार्य डॉ. संजय जगताप उपस्थित होते. रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सोपान आयनर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना पाटील व डॉ. अश्विनी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









