इस्त्रीचे कपडे आणण्यासाठी घराबाहेर पडला, मात्र परतलाच नाही; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू
योगेश राऊत
शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार ज्ञानदेव रणदिवे (वय २५, व्यवसाय शेती, रा. बाळुबाईचा मळा, रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार रणदिवे हा ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव येथे इस्त्रीचे कपडे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाइकांकडे आणि संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर पोलिसांकडे धाव घेण्यात आली.
याप्रकरणी ओंकार याचे वडील ज्ञानदेव दशरथ रणदिवे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.२२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता तरुणाला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून किंवा अन्य प्रकारे त्याच्या इच्छेविरुद्ध नेऊन गुप्त ठिकाणी बेकायदेशीररीत्या ठेवले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार आह.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी तपासाची दिशा निश्चित करण्यात आली असून, त्याच्या बेपत्ता होण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









