कुरकुंभ एमआयडीसी रस्त्यावर अपघात; बिहारमधील तरुणाचा मृत्यू

कुरकुंभ एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावरील अपघातप्रकरणी २० वर्षीय वाहनचालकाविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

योगेश राऊत

दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावच्या हद्दीत कुरकुंभ एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावर भरधाव टाटा इन्ट्रा चारचाकी वाहनाने पायी चालत जाणाऱ्या तरुणाला पाठीमागून धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. अमरेशकुमार धरक्षण राम (वय २४, मूळ रा. बंधू बिगहा, बिहार) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातप्रकरणी टाटा इन्ट्रा वाहनचालक साहिल संदीप हाटकर (वय २०, रा. मोहननगर, बाणेर, पुणे; मूळ रा. जांभळा, ता. हदगाव, जि. नांदेड) याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सत्येंद्र बिफन राम (वय ४३) आणि त्यांचा पुतण्या अमरेशकुमार धरक्षण राम हे दोघेही पांढरेवाडी गावच्या हद्दीतील कुरकुंभ एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावरून पायी चालत जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टाटा इन्ट्रा चारचाकी वाहनाने (क्रमांक MH 12 YQ 2365) अमरेशकुमार याला जोरदार धडक दिली. वाहनचालकाने वाहन हयगयीने, अविचाराने आणि भरधाव वेगात चालविल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या धडकेत अमरेशकुमार याला गंभीर तसेच किरकोळ दुखापती झाल्या. मात्र, या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातात मृत्यू झाल्यानंतर अमरेशकुमार याचा अंत्यविधी कुटुंबीयांनी त्यांच्या मूळ गावी बिहार राज्यात केला. त्यानंतर फिर्यादी सत्येंद्र राम यांनी दौंड पोलीस ठाण्यात येऊन अपघातासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याची नोंद सहायक फौजदार साबळे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार नगरे करीत आहेत. अपघाताच्या नेमक्या परिस्थितीबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail