दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी
सत्यशोधक समाजाने भारतीय समाजाला स्थितिशीलतेकडून गतिशीलतेकडे नेले. शोषणमुक्त आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा विचार ही या चळवळीची महत्त्वपूर्ण देणगी आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे यांनी केले.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला २४ सप्टेंबर २०२६ रोजी १५३ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत डॉ. मुरकुटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ मुंढे होते.
डॉ. मुरकुटे यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याचा आढावा घेताना सामाजिक विषमता, शोषण आणि रूढींविरोधातील महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. धर्मचिकित्सा, स्त्री-पुरुष समानता, दास्यमुक्ती, शेतीतील परिवर्तन आणि समन्यायी विकास या क्षेत्रांतील सत्यशोधक समाजाचे योगदान त्यांनी अधोरेखित केले. महात्मा फुले यांचा विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेला, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ मुंढे यांनी सत्यशोधक विचारपरंपरेचा रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेशी असलेला संबंध स्पष्ट केला.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड, गंगोत्री होम्स, क्लब हेरिटेज आणि एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र टाइम्स मीडिया पार्टनर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश राऊत, पाहुण्यांची ओळख प्रा. गजानन घोडके, सूत्रसंचालन डॉ. शितल चौरे, तर आभार दीपक गायकवाड यांनी मानले. आयोजनासाठी उमेश पोटे यांनी सहकार्य केले. यावेळी सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.









