अंध व दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा देण्याचे निर्देश

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांच्या सूचना

पुणे : अंध व दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान अंध व दिव्यांग मतदारांना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी निवडणूक संचालन नियम, १९६१ मधील नियम ४०(अ) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर संबंधित नियमांचे काटेकोर पालन करून मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

अंध व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहाय्यकाची आवश्यकता असल्यास संबंधित मतदाराने मतदानाच्या किमान तीन दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित मतदाराने आपली अडचण स्पष्ट करून विहित नमुन्यात घोषणापत्र सादर करावे. त्यानंतर पीठासीन अधिकारी नियमानुसार पुढील कार्यवाही करतील.

सहाय्यकाच्या मदतीने मतदान झाल्यास त्याची नोंद नमुना १४-अ मध्ये ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, मतदान कक्षात प्रवेश करताना नियमांनुसार अधिकृत व्यक्तीशिवाय अन्य कोणतीही व्यक्ती उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान अंध व दिव्यांग मतदारांच्या मतदानासंबंधीच्या नियमांची सविस्तर माहिती द्यावी. सर्व मतदान केंद्रांवर विहित नमुन्यातील घोषणापत्रे आणि नमुना १४-अ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सहाय्यक सुविधेसाठी आगाऊ प्राप्त झालेल्या अर्जांची यादी तसेच संबंधित मतदारांची माहिती केंद्रनिहाय केंद्राध्यक्षांना द्यावी. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नमुना १४-अ मधील नोंदी संकलित करून निवडणूक निरीक्षकांच्या छाननीसाठी उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. अंध व दिव्यांग मतदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail