योगेश राऊत
श्री नवनाथ तरुण मंडळाचा उपक्रम; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून संस्कृती जपण्याचा प्रयत्न
गणेशवाडी (कानगाव) येथे श्री नवनाथ तरुण मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत असलेले हे मंडळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध पारंपरिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लेझीम, देवीची गाणी, भोंडला, भारूड, कीर्तन आणि भजन अशा कार्यक्रमांमधून मनोरंजनासोबतच भक्ती आणि संस्कृतीचा संगम साधला जात आहे. या उपक्रमांमुळे नव्या पिढीला पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख होण्यास मदत होत आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कानगाव ग्रामपंचायतीचे सदस्य मारुती कोऱ्हाळे आणि सौ. स्वप्नाली मारुती कोऱ्हाळे यांनी मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी लहान मुलांना वह्या व पेन असे शैक्षणिक साहित्य, तर महिलांना चपाती डबे भेटस्वरूपात दिले. या अनपेक्षित भेटवस्तूंमुळे महिला आणि लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणे, महिलांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा सकारात्मक संदेश आहे. मारुती कोऱ्हाळे आणि सौ. स्वप्नाली कोऱ्हाळे यांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल श्री नवनाथ तरुण मंडळ व नवरात्रोत्सव समितीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणारा हा नवरात्रोत्सव गणेशवाडी परिसरात विशेष आकर्षण ठरत आहे.









