नवनाथ तरुण मंडळ व भजनी मंडळाचा उपक्रम; वारकरी संप्रदायाची ५० वर्षांची परंपरा जपत काकड आरतीला प्रारंभ

योगेश राऊत
कानगाव : गणेशवाडी (ता. दौंड) येथे श्री नवनाथ तरुण मंडळ व भजनी मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भजनाचा कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात गणेशवाडीतील महिला भगिनी, तरुण वर्ग, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी तसेच अखंड हरिनाम सप्ताह समितीचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भजन, भक्तिगीते आणि हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता.
कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला मंडळाचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. तरुण वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक परंपरा जपण्याच्या उपक्रमाला हातभार लावला. सर्वांच्या सहभागामुळे कोजागिरी पौर्णिमा आनंददायी आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली.
या कार्यक्रमाला ह.भ.प. राहुल महाराज जराड, मंगेश महाराज शिंदे, गणेश महाराज विघ्ने, किरण महाराज फडके, स्वामी महाराज आरणे, श्रीनिवास महाराज महाडिक, रामदास महाराज फडके, शिवाजी महाराज फडके, शांताराम महाराज फडके, दशरथ महाराज फडके आणि लक्ष्मण महाराज फडके यांच्यासह वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होती.
तसेच तरुण वर्गातून मेजर भुजंग मेमाणे, गणेश मेमाणे, पांडुरंग फडके, किरण गायकवाड, विठ्ठल फडके, निरंजन फडके, स्वप्निल फडके, ऋषी भिकुले, गणेश कोंडे, भैय्या गायकवाड, नवीन घारे, विठ्ठल मेमाणे, महेश विघ्ने आणि विकास खराडे यांच्यासह अनेक तरुण सहभागी झाले होते. अखंड हरिनाम सप्ताह समितीचे तसेच श्री नवनाथ तरुण मंडळ व भजनी मंडळाचे सर्व सभासद या वेळी उपस्थित होते.
श्री नवनाथ तरुण मंडळ व भजनी मंडळाच्या वतीने वर्षभरातील विविध सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. वारकरी संप्रदायाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि गावातील धार्मिक व सांस्कृतिक एकोपा टिकून राहावा, या दृष्टीने मंडळाचे कार्य सुरू आहे. मंडळाची धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सोमवारपासून मंडळाच्या वतीने पहाटे काकड आरतीला प्रारंभ करण्यात आला. वारकरी संप्रदायाची आणि सुमारे पन्नास वर्षांपासून जपली जात असलेली परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहाटेच्या काकड आरतीमुळे गावातील धार्मिक वातावरण अधिक चैतन्यमय झाले आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते, महाराज मंडळी, अखंड हरिनाम सप्ताह समितीचे सभासद आणि ग्रामस्थांचे श्री नवनाथ तरुण मंडळ व भजनी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.









