पाटस येथील सामाजिक कार्याची दखल; १ नोव्हेंबर रोजी सोरतापवाडी येथे पुरस्कार वितरण सोहळा
योगेश राऊत
पाटस (ता. दौंड) येथील श्री. प्रमोद दिनकर ढमाले-देशमुख यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत साप्ताहिक ‘महाराष्ट्राची भूमी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध क्षेत्रांतील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ साठी त्यांची राज्यस्तरीय ‘आदर्श समाजभूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करणाऱ्या या निवडीमुळे पाटस परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रमोद ढमाले-देशमुख यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची यंदाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
श्री प्रमोद ढमाले-देशमुख यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी २०२१ मध्ये दौंड तालुका कोरोनायोद्धा पुरस्कार मिळाला. त्यानंतर २०२२ मध्ये भीमथडी साहित्यिक राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २०२३ मध्ये रयत शिक्षण संस्थेचा सामाजिक कार्य गौरव पुरस्कार त्यांना मिळाला.
२०२४ हे वर्षही त्यांच्या पुरस्कारांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या वर्षी त्यांना युवा भीम सेना महाराष्ट्र राज्य सामाजिक पुरस्कार, रोटरी क्लब एक्सलन्स जिल्हास्तरीय पुरस्कार आणि भीमथडी आरोग्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. तसेच २०२५ मध्ये भीमथडी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती.
विविध सामाजिक उपक्रमांतील सहभाग, आरोग्य क्षेत्रात गोरगरिबांना मदत करून समाजहितासाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल या पार्श्वभूमीवर त्यांची राज्यस्तरीय ‘आदर्श समाजभूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
साप्ताहिक ‘महाराष्ट्राची भूमी’च्या वतीने विविध क्षेत्रांतील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता शांताई लॉन्स, सोरतापवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात श्री प्रमोद ढमाले-देशमुख यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळणार असून, पाटस गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









