कोरेगाव भीमा येथील सव्वाचार लाखांच्या चोरीप्रकरणी शिक्रापूर पोलिसांची कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी जेरबंद
संपादक – योगेश राऊत
घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. दीपक बाळासाहेब ऊर्फ बाळू ढेरंगे (वय ३७, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, खंडणी, मारहाण, अपहरण आणि शस्त्र कायद्यांतर्गत दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोरेगाव भीमा येथील किरण पंडित ढेरंगे हे १८ जुलै २०२६ रोजी कुटुंबीयांसह घराबाहेर गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख, असा एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरीचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर या गुन्ह्यातील धनंजय दत्तात्रय घोडके याला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले होते. मात्र, या गुन्ह्यात सहभागी असलेला दीपक ढेरंगे हा पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्याच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान, दीपक ढेरंगे हा पुण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुण्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दीपक ढेरंगे याच्याविरुद्ध शिक्रापूरसह लोणीकंद, लोणी काळभोर, सिंहगड रोड, चंदननगर, संगमनेर आणि रांजणगाव या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर दरोडा, खंडणी, मारहाण, अपहरण आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असून, एका प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्यासह पोलीस कर्मचारी रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचित आणि नागेश वाघमारे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे करीत आहेत.









