गांजा, मटका, ऑनलाइन कॅसिनो, वेश्याव्यवसायासह अवैध सावकारीचा मुद्दा ऐरणीवर; कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
योगेश राऊत
दौंड शहर आणि परिसरात सुरू असल्याचा आरोप होत असलेल्या विविध अवैध धंद्यांसह वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली आहे. शहरात गांजा, मटका, ऑनलाइन कॅसिनो, वेश्याव्यवसाय, पत्त्यांचे क्लब आणि अवैध सावकारीसारखे प्रकार सुरू असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याशिवाय महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणे, घरफोड्या तसेच नागरिकांना मारहाण करण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दौंड पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेतली. माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर तातडीने आळा घालण्याची मागणी केली.
दौंड शहर हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र असल्याने शहरात दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. मात्र, शहरातील विविध भागांत अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. विशेषतः गांजा विक्री, मटका, ऑनलाइन जुगार, पत्त्यांचे क्लब आणि अवैध सावकारी यांसारख्या प्रकारांमुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
तसेच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणे, घरफोड्या आणि नागरिकांवर होणारे हल्ले यांसारख्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी गस्त घालावी, संशयित ठिकाणी तपासणी करावी आणि अवैध व्यवसायांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीच्या घटनांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी. नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनामुळे दौंड शहरातील अवैध धंदे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पोलीस प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









