२७ ते ३० जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांच्या उपस्थितीतच सार्वजनिक ठिकाणी राडा
योगेश राऊत
शिरूर : शिरूर शहरातील बसस्थानक परिसरात लग्नाच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) दुपारी घडली. जयराज लॉजसमोरील मोकळ्या जागेत घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांना शिवीगाळ, आरडाओरडा, झोंबाझोंबी आणि दगडफेक करण्यात आली. एवढेच नव्हे, तर मारामारीदरम्यान मिरची पूडचाही वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात १९ नामनिर्देशित आरोपींसह ९ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपासून ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत शिरूर बसस्थानकाजवळील जयराज लॉजसमोरील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. गावातील एका लग्नाच्या वादातून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या व्यक्तींनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
या वेळी दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांशी झोंबाझोंबी करत दगडफेक केली. तसेच मिरची पूड वापरून मारामारी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती संबंधितांना असतानाही हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कामकाजासमोरही प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सोनू मुरलीधर तावरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४(२), १२५(अ), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११०, ११२, ११७, ३७(१)(३) आणि १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार गवळी (बकल क्रमांक २२७१) यांनी केली.
लग्नासारख्या सामाजिक आणि कौटुंबिक विषयावरून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वादाचे रूपांतर हाणामारीत होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









