सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मुंबईतील न्यायमूर्ती वसंत शिवराम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
योगेश राऊत
कसबे पाटस येथील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या श्री नागेश्वर व्यापारी महासंघाच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची दखल घेत महासंघाला राज्यस्तरीय ‘आदर्श समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुणे सोरतापवाडी येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा सेवानिवृत्तीनंतर विशेष पुनर्नियुक्तीवर जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले मा. श्री. वसंत शिवराम पाटील (हगवणे) यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे पाटसच्या सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री नागेश्वर व्यापारी महासंघाच्या माध्यमातून परिसरातील सामाजिक उपक्रम, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विविध क्षेत्रांतील योगदानाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ व्यापारी संघटना म्हणून मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांशी जोडले जाऊन सामाजिक हिताच्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविण्याची भूमिका महासंघाकडून घेतली जात आहे. या कार्याची दखल घेऊन महासंघाची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुणे सोरतापवाडी येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात न्यायमूर्ती वसंत शिवराम पाटील यांच्या हस्ते महासंघाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. यावेळी श्री नागेश्वर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मिथुन शितोळे, हर्षद बंदिष्टी, विठ्ठल वाळुंजकर, सुनील शिवतारे, शैलेश पंडित आणि अमित पवार उपस्थित होते.
समाजासाठी काम करत असताना आपल्या कार्याची समाजाकडून तसेच प्रसारमाध्यमांकडून दखल घेतली जाणे, ही कोणत्याही संस्थेसाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असते. हा पुरस्कार म्हणजे महासंघाच्या आजवरच्या सामाजिक कार्याला मिळालेली पावती असून, यामुळे भविष्यात अधिक जोमाने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या पुरस्कारासाठी श्री नागेश्वर व्यापारी महासंघाची निवड केल्याबद्दल तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल साप्ताहिक ‘महाराष्ट्राची भूमी’ परिवार आणि सर्व आयोजकांचे महासंघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
श्रीनागेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या सहकार्याने समाजसेवेचा हा प्रवास यापुढेही असाच सुरू ठेवण्याचा निर्धार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाटसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या पुरस्कारामुळे स्थानिक नागरिकांकडूनही महासंघाचे अभिनंदन केले जात आहे.









