जनता दरबारात नागरिकांचा आवाज; मांडवगण फराट्यात आमदार माऊली कटके यांच्यासमोर समस्या मांडण्यासाठी मोठी गर्दी

पाणी, वीज, रस्ते, शेतीसह मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर नागरिकांचा थेट संवाद; ‘कोणत्याही गावाला पाणी कमी पडू देणार नाही’ – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके

संपादक- योगेश राऊत

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील वाघेश्वर मंदिर परिसरात नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या पुढाकारातून जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. गावोगावच्या सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित कामे थेट आमदारांसमोर मांडल्याने या जनता दरबाराला नागरिकांच्या प्रश्नांचा व्यासपीठ मिळाले.

पाणी, वीज, शेती, रस्ते, वन्यजीवांचा त्रास तसेच विविध नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. अनेक प्रश्न हे केवळ विकासकामांपुरते मर्यादित नसून शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले असल्याने उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या भावनिक पद्धतीने मांडल्या. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत आमदार कटके यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

सध्या पहिल्या आवर्तनाचे पाणी सुरू असून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करत ‘कोणत्याही गावाला पाणी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही आमदार कटके यांनी दिली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित असल्याने त्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या भागांमध्ये अद्याप पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही, अशा ठिकाणी स्वतःच्या खर्चातून पाण्याच्या टाक्या उभारून त्या कार्यान्वित करण्यात आल्याचेही आमदार कटके यांनी सांगितले. सामाजिक काम करताना केवळ मोठ्या विकासकामांकडे न पाहता सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पाणी, वीज तसेच वन्यजीवांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिरूर-हवेली मतदारसंघासाठी सुमारे १५० डीपी मंजूर करून घेण्यात आले असून, ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घाडगेवाडी, गायकवाड मळा यांसह विविध वस्त्यांमध्ये सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या समस्या असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार कटके यांनी दिले. वीजपुरवठा आणि संपर्क यंत्रणेशी संबंधित प्रलंबित दुरुस्तीची कामेही संबंधित विभागांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जनता दरबार हा केवळ समस्या ऐकण्याचा कार्यक्रम न राहता नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवादाचा प्रभावी दुवा ठरावा, यासाठी प्रत्येक प्रश्नाची नोंद घेऊन त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका आमदार कटके यांनी व्यक्त केली. गावागावातील नागरिकांनी आपले प्रश्न थेट मांडल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

यावेळी राजीव पाटील फराटे, बाबासाहेब फराटे, दादा पाटील फराटे, सुधीर फराटे इनामदार, वीरेंद्र शेलार, पंडितदादा फराटे, राजाभाऊ गदादे, प्रभाकर घाडगे, गोविंद तात्या फराटे, पंचायत समिती सदस्य केसवड ताई, महिंद्र शेलार, अशोक आप्पा जगताप, संजय फराटे, भाऊसो कोळपे, माऊली आप्पा फराटे, अक्षय फराटे, सिताराम जगताप, बालाजी कांबळे, राजू कांबळे, ‘सह्याद्रीचा आवाज’चे संपादक रमेश बनसोडे, यांच्यासह परिसरातील शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail