जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचेही उल्लंघन; दोन सज्ञान तरुणांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश
योगेश राऊत
दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील पवारवस्ती परिसरात हातात कोयते घेऊन एकमेकांविरुद्ध कोयते फिरवत दहशत निर्माण केल्याचा प्रकार रविवारी (दि. १ नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी दौंड पोलिसांनी दोन सज्ञान तरुणांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीओम विश्वनाथ येडके (वय २१, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी), निखिल संतोष पवार (वय २१, रा. पवारवस्ती, गोपाळवाडी) आणि १७ वर्षे ६ महिने वयाच्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने पवारवस्ती परिसरात हातातील कोयते एकमेकांविरुद्ध फिरवून सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, पुणे ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश जारी केला होता. या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. असे असतानाही संबंधितांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई रामचंद्र नवनाथ लवटे (वय २८) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २२३, ३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ व १३५ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार घाडगे (बकल नंबर ३३२७) यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार सय्यद करीत आहेत.
गावातील सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून, अशा प्रकारे शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.









