भेटवस्तू, पुष्पगुच्छांऐवजी गरजूंना मदतीचा हात; सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक
योगेश राऊत
दौंड : वाढदिवस म्हटले की शुभेच्छांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि विविध प्रकारच्या खर्चाची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या पारंपरिक पद्धतीला फाटा देत दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (पाटील) यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील दुष्काळग्रस्त आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल २७ हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ न आणता दुष्काळग्रस्त व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा जगदाळे यांनी केले होते. त्यांच्या या संवेदनशील आणि समाजाभिमुख भूमिकेला सहकारी, पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या उपक्रमांतर्गत नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी ११ हजार रुपये, युवा सहकारी अक्षय गावडे यांनी ११ हजार रुपये, तर रमेश कुंडलिक जठार यांनी ५ हजार रुपयांचे आर्थिक योगदान दिले आहे. अशा प्रकारे एकूण २७ हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे.
आजच्या काळात वाढदिवस साजरा करताना मोठ्या प्रमाणावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा समाजातील गरजू घटकांच्या उपयोगी आणण्याचा विचार या उपक्रमातून पुढे आला आहे. वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा हा प्रयत्न इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
‘शुभेच्छांपेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावरील समाधान महत्त्वाचे!’
याबाबत नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी जगदाळे यांनी सांगितले की, वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद यांच्यासोबतच समाजातील गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झाले, तर त्याहून मोठा आनंद दुसरा कोणताही नाही. या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देत आर्थिक योगदान देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनःपूर्वक आभार. समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
एकीकडे वैयक्तिक आनंदाचा सोहळा आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकीची जाणीव अशा दुहेरी उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे दौंड शहरात कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जमा झालेला हा निधी दुष्काळग्रस्त आणि गरजू नागरिकांसाठी मदतीचा आधार ठरणार असल्याने या उपक्रमाला अधिकाधिक नागरिकांनी हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









