जिल्हा सहकारी बँकेतील विजयानंतर खासदार नीलेश लंके यांचा पारनेरमधील विजयी सभेत विरोधकांना इशारा
– योगेश राऊत
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व प्रस्थापित राजकीय शक्ती एकवटलेल्या असतानाही सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर विजय मिळविला. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हीच आपल्या विजयाची खरी ताकद आहे. त्यामुळे दहशत आणि दादागिरीच्या राजकारणाला आपण भीक घालणार नाही. विरोधकांनी आपल्याला दहशत शिकविण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी विरोधकांना ठणकावले. जिल्हा सहकारी बँकेतील कथित अनियमितता आणि गैरव्यवहार बाहेर काढून शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पारनेर येथे आयोजित विजयी सभेत खासदार लंके बोलत होते. या वेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान झालेला संघर्ष, विरोधकांकडून करण्यात आलेले प्रयत्न, पोलिस प्रशासनाचा कथित वापर, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि बँकेच्या कारभारातील अनियमिततेच्या मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली.
खासदार लंके म्हणाले की, या निवडणुकीत सर्व प्रस्थापित शक्ती एका बाजूला होत्या, तर आपण एकटे मैदानात होतो. मात्र, सर्वसामान्य जनतेने आपल्यावर विश्वास दाखविला. पैशांचे आमिष दाखविण्यात आले, तरी मतदारांनी त्याला नकार दिला. आपण विजयी होणार नाही, असे सांगणाऱ्यांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे. सर्वसामान्य लोक आपल्या पाठीशी उभे राहतात; मात्र मोठ्या लोकांना आपला त्रास होतो. तुमच्या आशीर्वादाने राजकीय चक्रव्यूह भेदून आपण विजय मिळविला आहे. आपण मागच्या दाराने येणारे नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
या निवडणुकीत तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांसह विविध पक्षांतील कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहिले. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मैत्री केली तर ती मनापासून आणि संघर्ष केला तर तोही ठामपणे करतो. गद्दारी करणे आपल्या स्वभावात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला मदत करणाऱ्या अनेकांची नावे जाहीर करणार नसल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
बँकेचे ठराव सुरू झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ठरावासाठी पोलिस प्रशासनाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ता कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणाचीही लाचारी पत्करू नये, असे आवाहन करत भविष्यात सत्ताबदल होऊ शकतो, याची जाणीव ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर स्टेटस ठेवले तरी गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ज्या प्रकाश गाजरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली, त्यांनीही मतदारांचे संपर्क क्रमांक पाठवून आपली निष्ठा कायम ठेवली. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचे लंके यांनी सांगितले. छुपे डाव खेळण्यापेक्षा समोरून राजकीय संघर्ष करावा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
पारनेर तालुक्याच्या स्वाभिमानाचा उल्लेख करताना खासदार लंके म्हणाले की, हा सेनापती बापटांचा तालुका आहे. झुकणारा, वाकणारा किंवा स्वाभिमान विकणारा हा तालुका नाही. विरोधकांनी दादागिरी आणि दहशतीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने विरोधकांना घरी पाठविले आहे. आगामी काळातही जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. राजकारणात दिवस बदलत असतात, असे सांगत आगामी राजकीय वाटचालीचे संकेतही त्यांनी दिले.
मतांसाठी एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप करत आता संबंधितांनी ते प्रवेश देऊन दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले. या निवडणुकीत विरोधी गटासोबत फिरणाऱ्या अनेकांनीही आपल्याला पाठिंबा दिला. मात्र, त्यांची नावे उघड करणार नाही. तालुक्यातील अंतर्गत एकजूट कायम ठेवून बाहेरील राजकीय शक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. मात्र, बँकेचा कारभार ठराविक लोकांच्या हितासाठी वापरला जात असल्याची टीका त्यांनी केली. काही कारखानदारांना शेकडो कोटी रुपयांची कर्जे, कर्जवाटपातील कथित अनियमितता, मनमानी कारभार आणि हातउसने पैसे देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
बँकेचा कारभार सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या हिताचा झाला पाहिजे. गरीब शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे, तसेच गरीब कुटुंबांतील तरुणांनी उद्योजक आणि व्यावसायिक व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करून रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार कर्जवाटप आणि नियमांनुसार कर्जवसुली झाली पाहिजे. ज्यांनी बँकेकडून हातउसने पैसे घेतले आहेत, त्यांच्या व्यवहारांची चौकशी करून नियमानुसार कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
बँकेतील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठीच आपण बँकेत गेलो आहोत. बँकेचा कारभार पारदर्शक झाला पाहिजे आणि शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य मिळाले पाहिजे, हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व प्रस्थापित राजकीय शक्ती एका बाजूला असतानाही मतदारांनी आपल्याला साथ दिली. याच जनशक्तीच्या बळावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे नियोजन करण्यात येणार आहे. या निवडणुकांमध्ये शंभर टक्के विजय मिळविण्याचे लक्ष्य ठेवले असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील जनतेने दाखविलेला विश्वास हा केवळ एका निवडणुकीतील विजय नसून, सर्वसामान्यांच्या राजकीय सहभागाचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करून जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही खासदार नीलेश लंके यांनी विजयी सभेत दिली.








