पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ गुन्हे उघडकीस, १० तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकींसह १५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
– योगेश राऊत
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील १० आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील दोन, असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि त्यांचे पथक इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित मोबाईल उर्फ हरी पवार, राहुल उर्फ चिल्या मंगेश काळे आणि महेश उर्फ मावड्या मंगेश काळे हे इंदापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे-सोलापूर बायपास रस्त्यावरील जगदंब हॉटेलजवळ सापळा रचला. काही वेळातच मोटारसायकलींवरून तीन जण तेथे आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आवश्यक बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता मोबाईल उर्फ हरी पवार (वय २२, रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडील मोटारसायकलींबाबत चौकशी केली असता त्या चोरीच्या असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडून युनिकॉर्न (क्र. एमएच १३ ईक्यू ४९१०) आणि स्प्लेंडर (क्र. एमएच १३ डीडब्ल्यू २७२३) या दोन मोटारसायकली जप्त केल्या. या वाहनांबाबत पंढरपूर आणि करकंब पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. तसेच दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईलही त्यांच्याकडून मिळून आला.
दुसरीकडे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचाही या तपासादरम्यान उलगडा झाला. या गुन्ह्यात शक्तिमान हुबऱ्या काळे (वय २२, रा. माळेगाव, ता. बारामती) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाल्याने शक्तिमान काळे याला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी आणि विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील एक दरोडा, एक जबरी चोरी आणि आठ घरफोड्या, तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईमुळे दौंड, इंदापूर, वालचंदनगर, भिगवण, वडगाव निंबाळकर, करकंब आणि पंढरपूर परिसरातील विविध गुन्ह्यांचा तपास पुढे आला आहे. आरोपींनी कबूल केलेल्या गुन्ह्यांमध्ये दौंड पोलीस ठाण्यातील दोन, इंदापूर पोलीस ठाण्यातील तीन, वालचंदनगर पोलीस ठाण्यातील तीन, भिगवण पोलीस ठाण्यातील एक, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील एक, तसेच सोलापूर ग्रामीणमधील करकंब आणि पंढरपूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा समाविष्ट आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या सहकार्याने करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बाळासाहेब कारंडे, विनोद भोकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा, इंदापूर पोलीस ठाणे आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस ठाणे करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण परिसरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.









