दौंड नगरपरिषदेच्या २६९ दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य खात्यावर जमा!

दिवाळीपूर्वीच १६ लाख १४ हजार रुपयांच्या पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचे वाटप

– योगेश राऊत

दौंड : दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन येतो. समाजातील दिव्यांग बांधवांचीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी, त्यांनाही सणाच्या काळात आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने दौंड नगरपरिषदेच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचे दिवाळीपूर्वीच वाटप करण्यात आले आहे.

दौंड नगरपरिषदेकडे नोंदणी असलेल्या एकूण २६९ दिव्यांग बांधवांच्या खात्यावर प्रत्येकी ६,००० रुपये याप्रमाणे एकूण १६ लाख १४ हजार रुपये (अक्षरी सोळा लाख चौदा हजार रुपये) आज जमा करण्यात आले आहेत. दिवाळीला अवघे आठ दिवस शिल्लक असताना हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याने दिव्यांग बांधवांना सणाच्या खरेदीसह आवश्यक खर्चासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वीच हा निधी मिळावा, यासाठी करण्यात आलेली विनंती मान्य करून नगरपरिषदेने वेळेत निधी वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण केली. नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (पाटील), उपनगराध्यक्षा छायाताई दीपक थोरात तसेच मुख्याधिकारी सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून आणि सहकार्याने हा निर्णय प्रत्यक्षात उतरला.

दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य घटक असून, त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक सहाय्य वेळेत उपलब्ध व्हावे, ही या निर्णयामागील भूमिका आहे.

दिवाळीच्या आनंदात प्रत्येकाचा सहभाग असावा, कोणाचेही सणाचे सुख आर्थिक अडचणीमुळे हिरावले जाऊ नये, या भावनेतून दौंड नगरपरिषदेने दिव्यांग बांधवांच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच निधी जमा करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (पाटील) यांचा वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव, माहेश्वरी प्रगती मंडळ दौंडचे रामेश्वर मंत्री, स्वर्गीय सुभाष अण्णा कुल मुलांची विशेष शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच श्री. गणेश हाके सर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail