वॉर्डमधील खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न; नर्सिंग कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा केला प्रयत्न, उपचारापूर्वीच मृत्यू
– योगेश राऊत
बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा रुग्णालयाच्या इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) दुपारी घडली. रणजीत दत्तात्रय शितोळे असे मृत रुग्णाचे नाव आहे. वॉर्डमधील पॅसेजच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत शितोळे यांना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये ठेवण्यात आले होते. शितोळे यांना मद्याच्या दीर्घकालीन व्यसनाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल करताना त्यांना रक्ताच्या उलट्या होत असल्याचे तसेच फिट्स येत असल्याचे नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले होते. त्यानुसार वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले होते.
रुग्णाच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी मेंदूचा सीटी स्कॅन केला होता. तसेच मानसोपचारतज्ज्ञ आणि कान-नाक-घसा (ईएनटी) तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला होता. रुग्णाची प्रकृती आणि वर्तणूक अस्वस्थ असल्याने त्याच्या देखरेखीबाबत नातेवाईकांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. रुग्णाजवळ नातेवाईकांनी थांबणे आवश्यक असल्याचेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
मात्र, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक रुग्णालयातून निघून गेले होते. दरम्यान, गुरुवारी (दि. ५) दुपारी सव्वाचारच्या सुमारास शितोळे यांनी वॉर्डमधील पॅसेजच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नादरम्यान त्यांचा तोल जाऊन ते इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर पडले.
घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णाचा शोध घेतला असता ते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने कॅज्युअल्टी विभागात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची रुग्णालय प्रशासनाकडून एमएलसी (मेडिको-लीगल केस) नोंद करण्यात आली असून, पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, वॉर्डमधील खिडक्या आणि पॅसेजची सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का, तसेच रुग्णाच्या अस्वस्थ वर्तणुकीची माहिती असताना त्याच्यावर आवश्यक ती देखरेख ठेवण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना सूचना दिल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष घटनेच्या वेळी रुग्णालयातील सुरक्षा आणि देखरेखीची व्यवस्था कशी होती, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









