गणेशरोड परिसरात शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी
– योगेश राऊत
दौंड तालुक्यातील नानगाव येथे बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नानगाव येथील गणेशरोड परिसरात बिबट्याने शेतकरी अमरसिंह संजय देवकर यांच्या घरासमोर बांधलेल्या चार शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. बुधवार (दि. ४ नोव्हेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सोनल राठोड आणि वनमजूर अरुण मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यापूर्वीही परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातच चार शेळ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला असून, ऊसाच्या शेतांमधील बिबट्यांचे अधिवास बदलत आहेत. त्यामुळे बिबट्यांचे स्थलांतर सुरू असून, मानवी वस्तीजवळ त्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनरक्षक सोनल राठोड यांनी केले आहे.
ऊसाच्या शेतात जाताना सोबत काठी ठेवावी, शेतात काम करताना शक्यतो वाकून काम करू नये आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवावे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे लहान मुले मामाच्या गावाला येत असल्याने पालकांनी मुलांना एकटे बाहेर पाठवू नये तसेच त्यांची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असलेल्या ठिकाणी राहावे आणि शक्यतो समूहाने वावरावे, अशा सूचनाही वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नानगाव परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असल्याची माहिती वनरक्षक राठोड यांनी दिली.
नानगाव परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, ग्रामपंचायतीच्या सरपंच शितल शिंदे यांनी वनविभागाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्याला बळी पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, भविष्यात बिबट्याने एखाद्या नागरिकावर किंवा लहान मुलावर हल्ला केल्यास होणारी जीवितहानी कधीही भरून न निघणारी असेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
वनविभागाने नागरिकांना केवळ खबरदारीच्या सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता नानगाव परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत आणि बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी सरपंच शितल शिंदे यांनी केली आहे.
नानगावच्या गणेशरोड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे बिबट्याच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेळ्यांवरील हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग कोणती ठोस कारवाई करणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार, याकडे नानगावसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.









