पाटसमध्ये ‘अंधत्वाकडून दृष्टिकडे’ अभियानातून ५,६९३ जणांना मिळाली नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचा २०१६ पासून अखंड सेवायज्ञ; आतापर्यंत ८,७८५ रुग्णांची तपासणी, २,७१४ जणांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप
योगेश राऊत
पाटस : ग्रामीण भागातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोतीबिंदूच्या आजारातून मुक्त करून त्यांना पुन्हा दृष्टी मिळवून देण्याच्या उद्देशाने नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटस यांच्या वतीने राबविण्यात येत असलेले ‘अंधत्वाकडून दृष्टिकडे’ हे अभियान अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. जून २०१६ पासून सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत तब्बल ८ हजार ७८५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ हजार ६९३ रुग्णांवर यशस्वीरीत्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच २ हजार ७१४ रुग्णांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटस आणि के.के.आय. इन्स्टिट्यूट, साधू वासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या २० तारखेला पाटस येथे मोफत मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक गरजू रुग्णांना पुणे येथे जाऊन उपचार घेणे शक्य झाले आहे.
रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू निदान शिबिरात एकूण ४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. त्यानुसार बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी या २० रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे येथे पाठविण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो रुग्णांना नव्याने दृष्टी मिळाली असून, अनेकांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण झाला आहे. केवळ मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रियेपुरते मर्यादित न राहता, गरजू रुग्णांना अल्पदरात चष्मे उपलब्ध करून देण्याचे कार्यही संघाच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.
‘अंधत्वाकडून दृष्टिकडे’ हे मोतीबिंदूमुक्त अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबवून समाजातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांना या सेवेचा लाभ मिळवून देण्याचा मानस नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
या मोफत शिबिरासाठी बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे येथील श्री. गिरीश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटसचे संस्थापक अध्यक्ष नेत्रमित्र डॉ. पांडुरंग श्रीपतराव लाड उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत तपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्म्यांच्या माध्यमातून दृष्टीचा नवा प्रकाश देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.









