गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी आण्णासाहेब गिरीला बलात्काराच्या गुन्ह्यात पुन्हा अटक

 

न्यायालयीन कोठडीत असताना प्रोडक्शन वॉरंटद्वारे घेतले ताब्यात; २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

 

 योगेश राऊत

 

यवत : गर्भलिंग निदान प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आण्णासाहेब आप्पा गिरी (वय ४२, रा. केडगाव स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे) याला यवत पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या गिरी याला प्रोडक्शन वॉरंटद्वारे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयाने आरोपीला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

यवत पोलीस ठाण्यात १६ सप्टेंबर २०२६ रोजी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आण्णासाहेब गिरी याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६९ व ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गर्भलिंग निदान प्रकरणात अटक झाल्यानंतर आरोपी गिरी हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या नव्या गुन्ह्याच्या तपासासाठी यवत पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट प्राप्त केले. त्यानुसार २४ सप्टेंबर रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्याला ताब्यात घेऊन संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.

अटकेनंतर आरोपीला विहित मुदतीत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या कालावधीत आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येणार आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार प्रमोद गायकवाड, सुहास देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, विनित कुर्‍हाडे आणि मोहन भानवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail