एस. एम. जोशी कॉलेज व साधना शैक्षणिक संकुलात कर्मवीर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर आणि साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चेतन (दादा) तुपे पाटील, चेअरमन, पश्चिम विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा होते. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (माध्यमिक विभाग) बंडू पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्याख्याते व कवी अनंत राऊत यांनी प्रमुख व्याख्यान दिले. यावेळी दिलीप (आबा) तुपे, अरविंद तुपे, अमर तुपे, रामदास जगदाळे आणि अशोक जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘साधना’ नियतकालिकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ओंकार कहार या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या वतीने पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आमदार चेतन (दादा) तुपे पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज रयत शिक्षण संस्थेचे अनेक विद्यार्थी सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. कर्मवीरांचा शैक्षणिक व सामाजिक विचार आत्मसात करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे.

प्रमुख व्याख्याते कवी अनंत राऊत यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शैक्षणिक व सामाजिक कार्य केले. विविध जाती-धर्मांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू करून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला.

प्रमुख अतिथी बंडू पवार यांनी कर्मवीरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवली. विविध जाती-धर्मांतील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे वसतिगृहात ठेवून त्यांनी सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला. कर्मवीरांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्य, प्रामाणिकपणा, श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाची मूल्ये रुजवली. आजच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानासारख्या आधुनिक साधनांचा योग्य वापर केला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डी. जी. जाधव यांनी करून दिला. आभार प्राचार्य आनंदराव करे यांनी मानले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. अतुल चौरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. छाया सकटे आणि डॉ. अर्चना पाटील यांनी केले. कार्यक्रमास एस. एम. जोशी कॉलेज आणि साधना शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail