कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जनजागृती

नर्सिंग विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य; मानसिक आरोग्य जपण्यासह गरजू व्यक्तींना भावनिक आधार देण्याचा संदेश

 प्रतिनिधी – मयूर कांबळे

मानसिक आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे, तणाव व नैराश्याची लक्षणे वेळीच ओळखणे आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींना योग्य वेळी मदतीचा हात देणे, या उद्देशाने कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दौंड येथील सुष्रुषा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस आणि कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याचे महत्त्व वाढत असून, विविध कारणांमुळे अनेक व्यक्तींना मानसिक तणाव, नैराश्य आणि भावनिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तींच्या समस्या समजून घेणे, त्यांच्याशी संवेदनशीलतेने संवाद साधणे आणि त्यांना वेळेत समुपदेशन व आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पोळ, सत्वशील भाऊ शितोळे, राहुल हनुमंतराव भोसले, सुमन निकाळजे, कुरकुंभ ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री भागवत व राहुल शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र माळी, सुष्रुषा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. ज्योत्स्ना देशपांडे, उपप्राचार्य प्रा. डी. एम. मंजुनाथ, सुमन कसबे आणि अक्षय चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सुष्रुषा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसच्या बी.एस्सी. नर्सिंगच्या पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य आणि भूमिका-अभिनय. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्या समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.

मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीला केवळ सल्ला देण्यापेक्षा तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, तिला भावनिक आधार देणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत मिळवून देणे किती महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. त्यांच्या सादरीकरणातून आत्महत्या प्रतिबंध ही केवळ एका व्यक्तीची किंवा आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नसून, संपूर्ण समाजाच्या सहभागातून साध्य होणारी सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.

आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी तिच्या भावनिक स्थितीची जाणीव ठेवून सहकार्य करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या लपविण्याऐवजी त्याबाबत मोकळेपणाने बोलणे, गरज भासल्यास समुपदेशक किंवा वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणे आणि संकटाच्या काळात संबंधित व्यक्तीला एकटे न सोडणे, या बाबींवर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नर्सिंग विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सादर केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंगचे विद्यार्थी तसेच कुरकुंभ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजागृती, सामाजिक सहभाग आणि आरोग्यविषयक संवेदनशीलतेचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail