प्रतिनिधी- महेंद्र रणधीर
सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे दौंड तालुक्यातील ज्येष्ठ कलाप्रेमी व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते डॉ. अशोक (बाबा) जाधव यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कला, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. अशोक (बाबा) जाधव हे अखिल महाराष्ट्र तमाशा थिएटर मालक असोसिएशनचे अध्यक्ष असून, न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, वाखारी–चौफुला, ता. दौंड, जि. पुणे या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्ध परंपरा जपण्यासाठी तसेच कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
तमाशा, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा दीर्घकाळापासून संबंध असून, या क्षेत्रातील विविध प्रश्न आणि कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
याशिवाय डॉ. जाधव यांनी सांस्कृतिक कार्य विभाग, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य येथे सदस्य म्हणूनही काम केले आहे. पुणे येथील वयोवृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी ज्येष्ठ आणि वयोवृद्ध कलाकारांच्या प्रश्नांशी संबंधित कामकाजातही योगदान दिले आहे.
कलाक्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच लोककलेला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी डॉ. जाधव यांनी विविध पातळ्यांवर काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
डॉ. अशोक (बाबा) जाधव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने दौंड तालुक्यातील कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, दौंड तालुक्यातील लोककला आणि सांस्कृतिक चळवळीचाही सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून डॉ. जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दौंड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.









