नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे पाटील यांचे नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
संपादक- योगेश राऊत
दौंड: तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या झळा तीव्र होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर, दौंड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळ्याची नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे पाटील आणि उपनगराध्यक्ष छायाताई थोरात यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या या तळ्यात अवघा दोन ते अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले असून, आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनावर विशेष भर दिला जात आहे.
शहरातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. तळ्यातील पाण्याची सद्यःस्थिती, उपलब्ध साठा आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. पाणी पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे आणि उपनगराध्यक्षा छायाताई थोरात यांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
या वेळी बोलताना नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे म्हणाल्या, “तळ्यात सद्यःस्थितीत अवघा दोन ते अडीच महिन्यांचाच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पुढे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दौंड शहरातील जनतेने पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा.”
प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आखले जात असून, शहरात टंचाई भासू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही या वेळी पदाधिकाऱ्यांनी दिले. या पाहणीदरम्यान नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.









