एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यान; आधुनिक अकाउंटिंग तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख
योगेश राऊत
आधुनिक उद्योगविश्वात अकाउंटिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेखांकनाच्या ज्ञानासोबतच आधुनिक अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे व्यावहारिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने ए. सि दिवेकर महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘SAP FICO Accounting’ या विषयावर मार्गदर्शनपर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीची माहिती मिळाली.
या व्याख्यानासाठी पुणे येथील Nice Computer चे संचालक प्रशांत बाळू टेंबरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
क्रिएटिव्ह कॉम्प्युटर, पाटसचे संचालक सचिन निंबाळकर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीचे शिक्षण पूर्ण करणे पुरेसे नसून, विद्यार्थ्यांकडे उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये असणे महत्त्वाचे ठरत आहे. विशेषतः अकाउंटिंग, फायनान्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सॉफ्टवेअरचे ज्ञान उपयुक्त ठरते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या प्रणालीची ओळख करून देण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते प्रशांत बाळू टेंबरे यांनी विद्यार्थ्यांना SAP FICO या प्रणालीची सविस्तर माहिती देताना तिचे कार्य, उपयोग आणि व्यावसायिक क्षेत्रातील महत्त्व स्पष्ट केले. SAP FICO म्हणजे Financial Accounting and Controlling असून, मोठ्या कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन, लेखांकन, आर्थिक अहवाल तयार करणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी या प्रणालीचा वापर केला जातो, असे त्यांनी सांगितले.
व्याख्यानादरम्यान General Ledger Accounting, Accounts Payable, Accounts Receivable, Asset Accounting, Bank Accounting आणि Financial Reporting या SAP FICO मधील महत्त्वाच्या घटकांची माहिती देण्यात आली. कंपनीतील आर्थिक व्यवहारांची नोंद कशी केली जाते, ग्राहक आणि पुरवठादारांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते, बँक व्यवहारांची नोंद कशी ठेवली जाते आणि आर्थिक अहवाल कसे तयार केले जातात, याचे स्पष्टीकरण उदाहरणांसह करण्यात आले.
तसेच SAP FICO मधील विविध Transaction Codes चा उपयोग, Debit-Credit पद्धतीने आर्थिक व्यवहारांची नोंद आणि आधुनिक ERP प्रणालीचे महत्त्व याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे लेखांकनाच्या सैद्धांतिक अभ्यासाचा प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाजाशी असलेला संबंध समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी अकाउंटिंगच्या पारंपरिक ज्ञानासोबत Tally Prime, GST, Advanced Excel आणि SAP FICO यांसारख्या कौशल्यांवरही प्रभुत्व मिळवावे. या कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांना अकाउंटिंग, फायनान्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध करिअर संधींसाठी स्वतःला तयार करता येईल, असे प्रतिपादन प्रशांत बाळू टेंबरे यांनी केले. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार स्वतःच्या ज्ञानात भर घालणे आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ही काळाची गरज असल्याचेही या मार्गदर्शनातून अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते प्रशांत बाळू टेंबरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभागातील प्रा. संगीता साळवे, प्रा. स्वप्नाली दिवेकर, प्रा. नवनाथ दिवेकर तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता साळवे यांनी केले, तर प्रा. नवनाथ दिवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक अकाउंटिंग प्रणालीची माहिती मिळण्यासोबतच उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा, तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व आणि भविष्यातील करिअरच्या संधी समजून घेता आल्या. अभ्यासक्रमातील ज्ञानाला व्यावहारिक कौशल्यांची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधींसाठी अधिक सक्षम होण्याची दिशा मिळू शकते.









