सोनवडी फाटा परिसरातील पान शॉपमधून ३ हजार १०९ रुपयांचा गुटखा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
योगेश राऊत
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसाल्याची विक्री होत असल्याच्या प्रकरणी दौंड पोलिसांनी कारवाई केली. दौंड-काष्टी रस्त्यावरील सोनवडी फाटा परिसरात हॉटेल संगमसमोर असलेल्या गाथा पान शॉपवर १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ हजार १०९ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी निलेश चंद्रकांत पाटोळे (वय ३५, रा. नानविज, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वितरण आणि वाहतूक करण्यास बंदी असतानाही संबंधित ठिकाणी या पदार्थांचा साठा आढळून आला. दौंड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई पवन शंकर माने यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी विमल पानमसाल्याची सात बंद पाकिटे, त्यांची किंमत १ हजार ३८६ रुपये; विमल पानमसाल्याच्या १३ पुड्या, किंमत २३४ रुपये; एम गोल्ड असे नमूद असलेल्या आर.एम.डी. पानमसाल्याच्या ४९ पुड्या, किंमत १ हजार २२५ रुपये; तसेच व्ही-१ नावाची १२ पाकिटे, किंमत २६४ रुपये, असा एकूण ३ हजार १०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार चमन शेख करीत आहेत.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.









