योगेश राऊत
आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित असताना प्रकार; दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक कक्षातून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा संगणक चोरीला गेल्याची घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी डॉ. तुकाराम रामचंद्र बनसोडे (वय ५०, व्यवसाय वैद्यकीय सेवा, सध्या रा. केडगाव चौफुला, ता. दौंड, जि. पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक कक्षात ही घटना घडली.
आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित असताना, आरोपी स्वप्निल बाळू पोटे (रा. बोरीबेल, ता. दौंड, जि. पुणे) याने कोणाचीही परवानगी न घेता आरोग्य केंद्रातील संगणक चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
चोरीस गेलेल्या मालामध्ये एचपी कंपनीचा पांढऱ्या रंगाचा ऑल-इन-वन संगणक, त्यासोबत कीबोर्ड व माऊस यांचा समावेश असून, या साहित्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८१/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गवळी करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार शिंदे यांनी केली.
सार्वजनिक आरोग्य केंद्रातील संगणकासारखे महत्त्वाचे उपकरण चोरीला गेल्याने शासकीय मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.









