यवत पोलिसांचा दणका राहूमध्ये डीजेच्या दणदणाटात गोंधळ; पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

राहू परिसरातील १३ नामनिर्देशित आरोपींसह २५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध यवत पोलिसांची कारवाई

यवत प्रतिनिधी – संदीप भालेराव

 यवत -दौंड तालुक्यातील राहू येथील थोरली विहीर परिसरात मोठ्या आवाजात डीजे लावून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व गोंधळ घालत उपद्रव केल्याप्रकरणी १३ नामनिर्देशित आरोपींसह २५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी उपद्रव थांबविण्याच्या वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास राहू येथील थोरली विहीर परिसरात हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती डीजे ध्वनियंत्रणेवर मोठ्या आवाजात गाणी लावून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व गोंधळ घालत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना उपद्रव थांबविण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी उपद्रव सुरूच ठेवल्याचे तसेच पोलीस कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना अटकाव केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पांडुरंग महात्मे (बक्कल क्रमांक ६८२), नेमणूक यवत पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २९२, २९३ आणि २२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी राहू, केडगाव आणि मांजरी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यामध्ये समाधान ईश्वर गाढवे, आप्पा जगदाळे, संग्राम सोनवणे, विजय कुंभार, आदित्य शिंदे, सार्थक चव्हाण, ओम सोनवणे, शंभू रामभाऊ कुल, भाऊ गाढवे, अथर्व पुणेकर, कृष्णा कोळपे, मनोज लोनकर आणि महेश तायगुडे यांचा समावेश असून, अन्य २५ अनोळखी व्यक्तींचाही उल्लेख फिर्यादीत आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ नये तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन व्हावे, यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail