चौफुला पुलासह पडवी–सुपे घाटाच्या सुधारणेसाठी आमदार राहुल कुल यांचा पाठपुरावा

कालव्यावर नवीन मोठा पूल उभारण्याची मागणी; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी मंत्रालयात चर्चा, आवश्यक कार्यवाहीच्या सूचना

यवत प्रतिनिधी – संदीप भालेराव

 दौंड विधानसभा मतदारसंघातील केडगाव–सुपे राज्य मार्गावरील बोरीपार्धी–चौफुला येथील नवीन मुठा उजव्या कालव्यावरील अरुंद पुलाचा प्रश्न आणि पडवी–सुपे घाटातील धोकादायक रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आमदार अॅड. राहुल कुल यांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही कामांना मंजुरी देऊन ती तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार कुल यांनी मंत्रालयात मंत्र्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.

केडगाव–सुपे राज्य मार्ग क्रमांक ११८ हा दौंड तालुक्यातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूक केली जाते. मात्र, बोरीपार्धी–चौफुला येथील नवीन मुठा उजव्या कालव्यावरील सध्याचा तीन गाळ्यांचा पूल अरुंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलावरून एकाच वेळी दोन जड वाहने सुरक्षितपणे जाऊ शकत नसल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे.

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील हडपसर ते यवत उन्नत महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल होण्याची शक्यता आहे. महामार्गावरील वाहतूक या राज्य मार्गाकडे वळवली गेल्यास केडगाव–सुपे मार्गावरील वाहनांची संख्या वाढू शकते. त्यामुळे सध्याच्या अरुंद पुलावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.

ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन बोरीपार्धी–चौफुला येथील कालव्यावरील विद्यमान पुलाचे रुंदीकरण करण्याऐवजी आवश्यकतेनुसार नवीन आणि अधिक रुंद पूल उभारण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे. भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन पुलाची उभारणी केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

केडगाव–सुपे राज्य मार्गावरील पडवी ते सुपे दरम्यानच्या घाट रस्त्याची स्थितीही चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घाटात तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणे आहेत. काही वळणांवर रस्त्याला आवश्यक असलेला उतार अर्थात ‘सुपर एलिव्हेशन’ पुरेशा प्रमाणात नसल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

विशेषतः जड वाहने घाटातील चढ चढताना मागे घसरण्याचा धोका निर्माण होतो. काही वाहनचालकांना विरुद्ध दिशेच्या लेनमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता वाढते. तसेच तीव्र वळणांवर वाहनावरील नियंत्रण सुटल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. या घाटात वाहने दरीत कोसळण्याच्या अनेक घटना घडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर घाट रस्त्याची तांत्रिक तपासणी करून आवश्यक ते भूसंपादन, घाट कटिंग, वळणांची सुधारणा आणि रस्त्याच्या चढाची तीव्रता कमी करण्याची कामे हाती घेण्याची मागणी आमदार कुल यांनी केली. रस्त्याची रचना अधिक सुरक्षित केल्यास जड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल.

चौफुला येथील कालव्यावरील नवीन पूल आणि पडवी–सुपे घाट रस्त्याच्या सुधारणेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी आमदार राहुल कुल यांनी सविस्तर चर्चा केली. या दोन्ही कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे येथील मुख्य अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

या दोन्ही कामांना मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामांना सुरुवात व्हावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार कुल यांनी स्पष्ट केले.

“केडगाव–सुपे मार्गावरील चौफुला पूल आणि पडवी–सुपे घाट या दोन्ही ठिकाणी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. उन्नत महामार्गाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी वाढणार आहे. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर मंजूर होऊन मार्गी लागावीत, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

चौफुला येथील पुलाची उभारणी आणि पडवी–सुपे घाटाची सुधारणा झाल्यास दौंड तालुक्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या दोन्ही प्रस्तावांवर शासनाकडून पुढील काळात कोणती कार्यवाही होते आणि प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail