इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा व्यवसायातील प्रामाणिक सेवा आणि ग्राहकांच्या विश्वासाची दखल; साप्ताहिक महाराष्ट्राची भूमीच्या वतीने गौरव
योगेश राऊत
व्यवसाय क्षेत्रात सातत्य, प्रामाणिकपणा, ग्राहकाभिमुख सेवा आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पाटस (ता. दौंड) येथील उद्योजक विनोद ज्ञानदेव कुरुमकर यांना व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे पाटससह दौंड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विनोद कुरुमकर हे पाटस येथे शिव इलेक्ट्रॉनिक्स’ या व्यवसायाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा ट्रेडिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती दौंड, शिरूर, इंदापूर, श्रीगोंदा आणि बारामती या पाच तालुक्यांपर्यंत विस्तारली आहे. या परिसरातील व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्यांची विक्री तसेच आवश्यक तांत्रिक सेवा आणि दुरुस्तीच्या माध्यमातून ते सेवा देत आहेत.
व्यवसाय करताना केवळ विक्रीवर भर न देता ग्राहकांना वेळेवर सेवा, दर्जेदार सुविधा आणि विश्वासार्ह व्यवहार देण्याला त्यांनी प्राधान्य दिले. उत्कृष्ट सर्व्हिस, ग्राहकांशी जपलेले सलोख्याचे संबंध आणि व्यवसायातील प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच व्यावसायिक वाटचालीची आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार वितरण सोहळा सोरतापवाडी (ता. हवेली) येथील शांताई लॉन्स मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संत गुरु रविदास सभेचे अध्यक्ष श्री. अनमोल/सुधीर सुखदेव वाघमारे आणि उरुळी कांचनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. विजयमाला पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश श्री. वसंत शिवराम पाटील (हगवणे) होते. तसेच लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
साप्ताहिक महाराष्ट्राची भूमीचे संस्थापक अध्यक्ष श्री. आनंदा (आण्णा) नंदू बारवकर यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, प्रशासकीय तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पाटससारख्या ग्रामीण भागातून व्यवसायाची सुरुवात करून पाच तालुक्यांमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या विनोद कुरुमकर यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. त्यांच्या पुरस्कारामुळे स्थानिक उद्योजकांनाही व्यवसायात सातत्य, गुणवत्ता आणि ग्राहकसेवेच्या माध्यमातून प्रगती साधण्याची प्रेरणा मिळणार आहे.









