एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन 

 

दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी 

 

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे आणि साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात होणार आहे.

 

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी व व्याख्याते अनंत राऊत यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (माध्यमिक विभाग) बंडू पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन आमदार चेतन (दादा) तुपे पाटील राहणार आहेत. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे व अरविंद तुपे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर हरिदास तुपे तसेच विभागीय अधिकारी संजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ या विचारातून आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून रुजविला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ मुंढे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail