शेतकरी महिलांना हक्काची ओळख मिळवून देण्यासाठी दौंड तालुक्यात विशेष अभियान सभापती सुखदेव चोरमले
प्रतिनिधी- संदीप भालेराव
यवत-: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दौंड तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने, मंडळ कृषी अधिकारी सतीश जगताप व उपकृषी अधिकारी संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी “महिला शेतकरी प्रमाणपत्र” देण्याचा क्रांतिकारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील खामगाव येथे आयोजित महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरण व मार्गदर्शन शिबिरात बोलताना पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांनी सांगितले की, “आजचा युग महिलांच्या सक्षमीकरणाचा आहे. शेतीत अहोरात्र कष्ट करणाऱ्या महिलांना हक्काची आणि अधिकृत ओळख मिळवून देणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित या विशेष शिबिरामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी विनायक जगताप यांनी मार्गदर्शन करताना, महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. शेतीत प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना या प्रमाणमुळे शासकीय योजनांचा लाभ, सुलभ कृषी कर्ज, पीक विमा, कृषी निविष्ठा आणि विविध कृषी विस्तार सेवा मिळवणे अत्यंत सुलभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सविस्तर प्रक्रिया त्यांनी महिलांना समजावून सांगितली.
या शिबिरामध्ये सीएससी (CSC) केंद्र चालक प्रियंका खेडेकर यांनी महिलांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे तांत्रिक कामकाज यशस्वीरीत्या पार पाडले. यावेळी मा.उपसरपंच कैलास बापू खेडेकर, विका सोसायटीच्या चेअरमन सुरेखा टिळेकर, प्रयोगशील शेतकरी शांताराम नागवडे, मा.ग्रा.पं.स.रोहिदास टिळेकर, मा.उपसरपंच संतोष नागवडे, मा. दिलीप खेडेकर, राहुल भालसिंग, अमोल मोडक, दत्तात्रय कांचन, महादेव गरड तसेच परिसरातील महिलावर्गाने या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.









