कोयंबतूर-मुंबई एक्स्प्रेसमधील घटना; दौंड ते हडपसरदरम्यान मोबाईल गायब, लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार
योगेश- राऊत
दौंड : दौंडहून पुण्याकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) घडली. दौंड ते पुणे रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करताना ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेत विद्यार्थ्याचे १७ हजार ६५० रुपये किमतीचे मोबाईल गमावले असून, याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संस्कार संतोष जाधव (वय १९, रा. दौंड) असे तक्रारदार विद्यार्थ्याचे नाव आहे. तक्रारीनुसार, संस्कार संतोष जाधव हा विद्यार्थी बुधवारी सकाळी सुमारे ८.५० वाजता दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ११०१४ क्रमांकाच्या कोयंबतूर-मुंबई (एलटीटी) एक्स्प्रेसमध्ये चढले होते. ते रेल्वेच्या एस/०७ डब्यातून प्रवास करीत होते.
रेल्वेने दौंड स्थानक सोडल्यानंतर प्रवास सुरू असताना सकाळी सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास मांजरी ते हडपसर रेल्वे स्थानकादरम्यान त्यांचा मोबाईल फोन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी डब्यातील आजूबाजूच्या प्रवाशांकडे चौकशी केली तसेच परिसरात मोबाईलचा शोध घेतला. मात्र, मोबाईल मिळून आला नाही.
आपला मोबाईल अज्ञात व्यक्तीने संमतीशिवाय लबाडीने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करीत विद्यार्थी संस्कार संतोष जाधव यांनी पुणे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे.
चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपशील
चोरीला गेलेला मोबाईल वनप्लस कंपनीचा ‘नॉर्ड सीई २ लाइट’ हा मॉडेल असून, त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिमकार्ड वापरण्यात येत होते. मोबाईलची किंमत १७ हजार ६५० रुपये आहे. या प्रकरणी ACR क्रमांक ६८६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३०५ (सी) चा उल्लेख करण्यात आला आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल चोरीला गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या डब्यांमध्ये प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मोबाईल, पाकीट तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, असे आवाहन पुणे लोहमार्ग पोलिसांनी केले आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.









