कुरकुंभमध्ये गावठी दारू विक्रीप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

जाधव वस्ती परिसरात झाडाच्या आडोशाला सुरू होती विक्री; पाच लिटर हातभट्टीची दारू जप्त

योगेश राऊत

कुरकुंभ, दि. २ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील जाधव वस्ती परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना एका २३ वर्षीय तरुणाला दौंड पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलिसांनी पाच लिटर गावठी दारू जप्त केली असून, संबंधित तरुणाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य शिवाजी राठोड (वय २३, मूळ रा. कोंढवा-कात्रज रोड, पुणे; सध्या रा. शेवाळे प्लॉट, कुरकुंभ, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.१८ वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ येथील जाधव वस्ती रोडलगत झाडाच्या आडोशाला आदित्य राठोड हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता, त्याच्याकडे पांढऱ्या रंगाच्या पाच लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून पाच लिटर दारू जप्त केली. या दारूची अंदाजे किंमत ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अंकुश कृष्णा दळवी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिपाई महादेव जाधव करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी केली.

दौंड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गावठी दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर पोलिसांनी लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail