इदगाह मैदानाजवळ झाडाझुडपात कत्तलीचा प्रकार; दोन जर्सी खोंड व एका कालवडीला कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे उघड
योगेश राऊत
दौंड : दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात इदगाह मैदानाजवळ झाडाझुडपात गोवंशाची कत्तल करून गोमांस साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४८ हजार रुपये किमतीचे ३०० किलो गोमांस तसेच कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली दोन जर्सी खोंड आणि एक जर्सी कालवड, असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांची चाहूल लागताच संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
ही घटना गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) पहाटे सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे इदगाह मैदानाच्या शेजारील झाडाझुडपात घडली.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल शशिकांत शहाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक जॉर्ज पिल्ले (वय २५, रा. बेतल कॉलनी, ईदगाह रोड, दौंड), आसिफ कासम कुरेशी आणि कय्यूम कुरेशी (दोघेही रा. खाटीक गल्ली, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोवंशाची कत्तल केली. तसेच दोन जर्सी खोंड आणि एका जर्सी कालवडीला चारा-पाणी तसेच औषधोपचारांची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवले होते. घटनास्थळावरून पोलिसांना १६० रुपये प्रतिकिलो दराने अंदाजे ४८ हजार रुपये किमतीचे ३०० किलो गोमांस आढळून आले.
याशिवाय अंदाजे तीन हजार रुपये किमतीचे पांढरे कपाळ व काळ्या रंगाची शिंगे असलेले एक खोंड, तीन हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे शिंगे असलेले एक जर्सी खोंड आणि तीन हजार रुपये किमतीची कपाळावर पांढरा ठिपका असलेली काळ्या रंगाची जर्सी कालवड अशी तीन जनावरे पोलिसांना मिळून आली. गोमांस आणि जनावरांची एकूण किंमत ५७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ६१ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार सागर म्हेत्रे यांनी केली.









