पाटस येथे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

पाटस व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; एम. व्ही. भागवत विद्यालयात सलग चौथ्या वर्षी उपक्रम

योगेश राऊत 

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पाटस व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा कै. एम. व्ही. भागवत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाटस येथे उत्साहात पार पडला. विद्यालयात सलग चौथ्या वर्षी ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शनिवार (ता. ३) रोजी झालेल्या या कार्यक्रमास पाटस व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पांडुरंग लाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. पांडुरंग लाड यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षांचा तसेच उपस्थित सर्व मान्यवर महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, जीवनातील संघर्ष आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान यांचा गौरव करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बरकडे सर तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दिवेकर सर यांनी केले. यावेळी पाटस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. माणकिराव चोरमले आणि दौंड तालुका कार्यकारिणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. हशीम शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. पांडुरंग लाड यांनी विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवाचे भांडार असून, त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठांचा आदर व सन्मान ही आपली सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कोळेकर सर यांनी केले. श्री. रांधवण सर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला.

सन २०२३ पासून विद्यालयात नियमितपणे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जात असून, सलग चौथ्या वर्षीही हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. सदाशिव सोनवणे, श्री. होले सर, श्री. लोंढे सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail