दौंड तालुक्यात भीषण दुष्काळ; ‘पंचनामे नको, सरसकट नुकसानभरपाई द्या’ – बळीराजा आक्रमक

पावसाची दडी, पिकांवर किडींचा प्रादुर्भाव अन् पिण्याच्या पाण्याचे हाल; चारा छावण्या व टँकर सुरू करण्याची मागणी

दौंड : प्रा. महेश देशमाने 

तालुक्यात यंदा पावसाने पार पाठ फिरवल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके जळून खाक झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतजमिनी पडून राहिल्या असून, दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ पंचनाम्यांचे सोपस्कार न करता ‘सरसकट नुकसानभरपाई’ जाहीर करावी, अन्यथा तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा दुष्काळग्रस्तांनी दिला आहे.

तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या वाया गेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा पाणी देऊन ऊस जगवला होता, त्यावर खोडकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. तर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उरले-सुरले पीकही हातातून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मशागतीवर हजारो रुपये खर्च केले, परंतु पावसाअभावी शेतात कोणतेच पीक घेता आले नाही. त्यामुळे मशागतीचा खर्च पूर्णपणे वाया गेला आह 

दुष्काळाची झळ केवळ शेतीलाच नाही तर पिण्याच्या पाण्यालाही बसली आहे. गावागावांत विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिला वर्गाला कडक उन्हात मैलोन्-मैल पायपीट करावी लागत आहे. सार्वजनिक विहिरी व हातपंपांवर सकाळपासून लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आह 

प्रशासनाकडून दरवर्षी उशिरा पंचनामे केले जातात. मात्र, ज्या शेतात पाऊस नसल्यामुळे पेरणीच झाली नाही किंवा पीकच उगवले नाही, त्या रिकाम्या रानांचे पंचनामे कसे होणार, असा थेट सवाल शेतकरी विचारत आहेत. वास्तविक पाहता दुष्काळाची दाहकता संपूर्ण तालुकाभर पसरलेली असताना सरकारने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

सरकारने तातडीने अधिकृत दुष्काळ जाहीर करावा.

पंचनामे न करता सर्व बाधित शेतकऱ्यांना  सरसकट आर्थिक मदत द्यावी बाधित गावांमध्ये तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत.

  पशुधनाच्या संरक्षणासाठी तातडीने चारा छावण्या उभारण्यात याव्यात. “दुष्काळामुळे सर्वसामान्य शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारने केवळ कागदी पंचनामे करू नये. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि सरसकट नुकसानभरपाई द्यावी. पाण्याचे टँकर व चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail