स्मार्ट मीटरवरून नेने चाळीत वाद; महावितरण महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल, मीटर हिसकावला

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा; ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून मीटर बसविण्याची मागणी

योगेश राऊत

दौंड : नेने चाळ परिसरातील मुरली अपार्टमेंटमध्ये स्मार्ट वीजमीटर बसविण्याच्या कामावरून महावितरणचे कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद झाल्याची घटना रविवारी (ता. ४) सकाळी घडली. स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करताना एका नागरिकाने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील मोबाईल आणि स्मार्ट मीटर हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. तसेच, मीटर बॉक्सला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर काढल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात एका नागरिकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या विद्युत सहाय्यक आकांक्षा विक्रमराव देवकर (वय २७, सध्या रा. संस्कार नगर, दौंड; मूळ रा. गेवराई, जि. बीड) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास देवकर या शिकाऊ वायरमन विद्या ईथापे व मयूर जाधव यांच्यासह नेने चाळ येथील मुरली अपार्टमेंटमध्ये स्मार्ट वीजमीटर बसविण्याचे काम करीत होत्या.

मीटर बसविण्याचे काम सुरू असताना अपार्टमेंटमधील रहिवासी भारत बागल (वय अंदाजे ५०) यांच्यासह काही नागरिक तेथे जमा झाले. ‘आमच्या इमारतीमध्ये स्मार्ट मीटर बसवायचे नाहीत,’ असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवकर यांनी घटनेचा मोबाईलवर व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी बागल यांनी त्यांना एकेरी भाषेत बोलून, ‘तू कोण आहेस? तुझा काय संबंध? तू शासकीय नोकर नाहीस, तू शिकाऊ आहेस,’ असे म्हणत व्हिडिओ काढण्यास विरोध केल्याचा आरोप आहे.
वाद वाढल्यानंतर बागल यांनी देवकर यांच्या हातातील मोबाईल आणि स्मार्ट मीटर जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर इमारतीच्या मीटर बॉक्सला कुलूप लावून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेनंतर देवकर यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारत बागल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १३१ व १३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार रामचंद्र नवनाथ लवटे करीत आहेत.

दरम्यान, स्मार्ट वीजमीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून सध्या अनेक ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जुन्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरमुळे वीजवापर अधिक नोंदविला जातो आणि त्याचा परिणाम वाढीव वीजबिलावर होतो, असा काही ग्राहकांचा दावा आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी त्यांच्यामध्ये असलेल्या शंका आणि गैरसमजांचे निरसन करण्याची मागणी होत आहे.

शासकीय कामात अडथळा आणणे अथवा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे योग्य नसले, तरी महावितरणनेही ग्राहकांशी संवाद साधून मीटर बदलाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नवीन स्मार्ट मीटर अचूक असल्यास त्याची कार्यपद्धती, वीजवापराची नोंद आणि जुन्या-नव्या मीटरमधील फरक याबाबत ग्राहकांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिल्यास गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकते.

ग्राहकांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया राबविल्यास महावितरण कर्मचारी आणि नागरिक यांच्यातील संघर्ष टाळता येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता ग्राहकांच्या शंकांचे निरसन आणि जनजागृती यावरही भर देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail