आदल्या दिवशी सोशियल मिडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेट्स आणि दुसऱ्या दिवशी भावपुर्ण श्रद्धांजली म्हणून स्टेट्स
प्रतिनिधी – नितिन गव्हाणे
पारगाव ता दौंड: पारगाव-नानगाव अष्टविनायक महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलरला धडकून १९ वर्षीय आर्यन वासुदेव (काका) ससाणे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रेलर थांबला असताना हा अपघात झाला. धडकेनंतर आर्यन याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पारगाव-नानगाव अष्टविनायक महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलरची संख्या वाढली असून, अशा वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ट्रेलरला पुरेसे रिफ्लेक्टर, मागील बाजूस स्पष्ट दिसणारी सुरक्षा चिन्हे तसेच रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशव्यवस्था असणे आवश्यक आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, संबंधित प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलरची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आर्यन ससाणे यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









