बोरीऐंदीत महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप; पीएम किसानसह विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन
यवत प्रतिनिधी – संदीप भालेराव
यवत : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शेतकरी महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज नोंदणी, पीएम किसान योजनेतील अडचणींचे निवारण तसेच विविध शासकीय कृषी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र शेतकरी महिलांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्रां’चे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी शेतकरी महिलांशी संवाद साधत महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत शेतकरी महिलांना कायदेशीर ओळख आणि अधिकार मिळवून देण्याच्या दृष्टीने महिला शेतकरी प्रमाणपत्र महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकुटुंबाच्या आर्थिक आणि कृषीविषयक निर्णय प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र, अनेक वेळा त्यांच्या योगदानाची अधिकृत नोंद होत नाही. महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे शेतकरी कुटुंबातील महिलांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला अधिकृत ओळख मिळण्यास मदत होणार असून, शासनाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
शिबिरादरम्यान पीएम किसान योजनेशी संबंधित अडचणी, अर्जातील त्रुटी, नोंदणी प्रक्रिया तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे याबाबत उपस्थित शेतकरी व महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे गावातील शेतकरी महिलांना शासनाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरीऐंदीचे सरपंच संदिप गायकवाड होते. त्यांनी गावपातळीवर अशा प्रकारच्या शासकीय उपक्रमांचे आयोजन झाल्याने शेतकरी आणि विशेषतः महिलांना योजनांचा लाभ घेणे सुलभ होत असल्याचे सांगितले. कृषी विभागाने भविष्यातही अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सतीश जगताप, उप कृषी अधिकारी संतोष मोरे, सहाय्यक कृषी अधिकारी पंढरीनाथ कुतवळ, विनायक जगताप, शैलेश मोरे आणि सूरज बाबर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शासनाच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या अडचणींचे गावपातळीवर निराकरण करणे आणि महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाबद्दल’ उपस्थित शेतकरी व महिलांनी समाधान व्यक्त केले.









