विश्रांतवाडीतील संतापजनक घटनेचे दौंड तालुक्यात तीव्र पडसाद; शनिवारी पाटस मध्ये मूक मोर्चा 

‘चलो पाटस’चा नारा; पीडित बालिकेला न्याय व आरोपीला कठोर शिक्षेसाठी मूक मोर्चा व निषेध सभेचे आयोजन

 

योगेश राऊत

पाटस : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्यंत संतापजनक आणि क्रूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे दौंड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या चिमुकलीला त्वरित न्याय मिळावा, आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षेची अंमलबजावणी व्हावी आणि बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) दौंड तालुक्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, दौंड तालुका यांच्या पुढाकाराने पाटस येथे विशाल मूक मोर्चा व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासोबतच नराधम आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली जाणार आहे.

बालिकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘चलो पाटस’चा नारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ठीक १० वाजता पाटस येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र जमून मूक मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलींच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न हा कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष, जात किंवा संघटनेचा भेद न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा द्यावा, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या:

  विश्रांतवाडी घटनेतील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कडक शिक्षा देण्यात यावी.

 शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात.

  अत्याचाराच्या घटनांची गंभीर दखल घेऊन पीडितांना न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया जलद करावी.

 नाभिक समाजातील सर्व व्यावसायिकांनी बंद पाळून शांततेच्या मार्गाने मूक मोर्चात सहभागी व्हावे आणि पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ, दौंड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail