यवत प्रतिनिधी – संदीप भालेराव
यवत :- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ‘ट्रिगर १’ लागू झाल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या आदेशानुसार संपूर्ण तालुक्यात गेल्या ३० सप्टेंबरपासून नुकसान भरपाई व पंचनाम्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत त्यांनी तातडीने संबंधित पथक प्रमुखेशी संपर्क साधून आपले पंचनामे पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन यवत चे साहाय्यक कृषी अधिकारी सुरज बाबर यांनी केले आहे.
पंचनामे विनाअथळा पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये यवत चे ग्राम महसूल अधिकारी श्री. महेश मेटे, यवत चे साहाय्यक कृषी अधिकारी तसेच यवत चे ग्रामपंचायत अधिकारी श्री.बालाजी सरवदे यांची पथक प्रमुख म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
कोणताही पात्र शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली ग्रामपंचायतीचे नोटिस बोर्ड तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व संबंधित शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आपले पंचनामे करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









