पाटसमध्ये श्री नागेश्वर मित्र मंडळाचा २७ वा नवरात्र महोत्सव उत्साहात; धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

रक्तदान शिबिरासह बालनृत्य व रांगोळी स्पर्धांचे आयोजन; १९ ऑक्टोबरला भव्य बक्षीस वितरण सोहळा

योगेश राऊत

पाटस (ता. दौंड) येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या २७ व्या नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा महोत्सव विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. श्री नागेश्वर फाउंडेशनच्या आयोजनातून होणाऱ्या या महोत्सवात माँ भवानीची पूजा, महाआरती, भव्य रक्तदान शिबिर, बालनृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळा असे विविध उपक्रम पार पडणार आहेत.

पाटस व परिसरातील भाविकांसाठी नवरात्र महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा उत्सव मानला जातो. यंदाही मंडळाच्या वतीने नऊ दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, भाविकांनी कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता कुरकुंभ येथून ज्योत आणण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता श्री नागेश्वर मंदिरापासून मिरवणूक काढून देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. रात्री ८ वाजता माजी सरपंच योगेंद्रबाबा शितोळे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.

महोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दररोज सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता माँ भवानीची नैमित्तिक पूजा व महाआरती आयोजित करण्यात आली आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या आरती पार पडणार आहेत.

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी स्व. मंगेशशेठ लक्ष्मणदास दोषी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उपासनेसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळच्या आरतीस संदीप गंगाराम दिवेकर, तर रात्रीच्या आरतीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात बालकलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बालनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. १४ ऑक्टोबरपासून रात्री ८.१० वाजता या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. गुरुवार, दि. १५, शुक्रवार, दि. १६, शनिवार, दि. १७, रविवार, दि. १८ आणि सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजीही बालनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी रात्रीच्या महाआरतीस दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे आणि नगरसेवक इंद्रजीत (जंग) जगदाळे उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी आरतीस माजी सभापती आप्पासाहेब पवार उपस्थित राहतील. शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य तुषारदादा थोरात, तर शनिवारी कृषी, शिक्षण व संशोधन परिषद महामंडळाचे अध्यक्ष वासुदेवनाना काळे यांच्या उपस्थितीत आरती होणार आहे.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नागेश्वर मित्र मंडळासमोरील मैदानावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन नागरिकांना आपली कलात्मकता सादर करण्याची संधी मिळणार आहे.

सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महोत्सवाची सांगता विविध कार्यक्रमांनी होणार आहे. रात्री ८.१० वाजता बालनृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धेची अंतिम फेरी आणि भव्य बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेशआप्पा थोरात यांच्या उपस्थितीत रात्रीची महाआरती होणार आहे.

महोत्सवाच्या विविध दिवसांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. नितीन संभाजी भागवत, नितीन दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, संजय विठ्ठलराव शिंदे, शिवकुमार मिश्रा, यशराज मनोहर आव्हाड, आण्णा मारुती मोरे, अनुराधाताई सत्वशील शितोळे, सत्वशीलभाऊ शितोळे, योगेशदादा जाधव आणि कांतीलाल राजाराम चांदगुडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आरतीचे कार्यक्रम पार पडणार आहेत.

सन २०२६-२७ साठी मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी शिवाजी (बापू) ढमाले, उपाध्यक्षपदी पोपटशेठ गायकवाड व हनुमानसिंह सोलंकी, कार्याध्यक्षपदी सागर वसंतराव शितोळे पाटील, उपकार्याध्यक्षपदी शहाजी सो. भागवत, खजिनदारपदी लहुचंद तु. खाडे, चिटणीसपदी जाकीर गणिभाई तांबोळी, सहचिटणीसपदी संतोष वि. शितकल, सचिवपदी गणेश व. रंधवे आणि जनसेक्रेटरीपदी राहुल म. आव्हाड यांची जबाबदारी आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून संतोष कोळपे यांचा समावेश आहे.

श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या नवरात्र महोत्सवात पाटस व परिसरातील ग्रामस्थ, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail