हार्वेस्टिंग मशीनमुळे उसाचा चारा वाया; शेतकऱ्यांची चिंता वाढली!

प्रतिनिधी- महेश देशमाने

  चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचे नुकसान; ऊसतोड कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न

राज्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होत असताना ऊसतोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टिंग मशीनमुळे उसाचा हिरवा पाला, वाढे आणि पाचट वाया जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पूर्वी हाताने ऊसतोडणी करताना मिळणारा हा चारा गायी-म्हशींसाठी वर्षभर उपयोगी पडत होता. मात्र, आधुनिक मशीनद्वारे ऊसतोडणी करताना पाला आणि वाढे बारीक तुकड्यांत कापले जात असल्याने त्याचा जनावरांसाठी पुरेसा उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे शासनाकडून चारा पेरणीवर भर देण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे शेतात उपलब्ध असलेला चारा वाया जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे दुधाळ जनावरांसाठी चारा विकत घेण्याचा अतिरिक्त आर्थिक भार पशुपालकांवर पडत आहे.

हार्वेस्टिंग मशीनच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक ऊसतोड कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हार्वेस्टिंग पद्धतीवर आवश्यक निर्बंध घालावेत किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ऊसतोडणीदरम्यान हिरवा चारा वाचविण्यासाठी शासनाने कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून उपाययोजना कराव्यात. तसेच शेतकऱ्यांचा चारा खर्च कमी करण्याबरोबरच ऊसतोड कामगारांच्या रोजगाराचाही विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail